कविता – 🌷 ” क्षण-क्षण मोलाचा “

कविता - 🌷 " क्षण-क्षण मोलाचा "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - शनिवार, २० एप्रिल २०२४
वेळ - रात्री ८ वाजून ३७ मि.

कधी कधी असं होतं...
आतूनच पिसा-सारखं
खूप हलकं, रंगीत
प्रफुल्लित वाटतं...

वेळ-काळाची बंधनं झुगारून
मन त्या आनन्दसागरात
यथेच्छ डुंबत राहतं...

काजवा जसा ज्योतीकडे...
तसं अंतरमन
लख्ख प्रकाशाकडे
झेपावतच राहातं...

परब्रह्माच्या त्या परमावधित...
मग सर्व काही विरघळून जातं ...
मी-तूपणाचा भाव,
मोह-मायाचं जाळं
सर्व भस्मसात होतं...

बाकी उरतं ते फक्त...
एक सुंदरसं नादब्रह्म...

स्वप्रकाश-रूपाचा...
तो आनन्द-सोहोळा
अवर्णनियच असतो...
तेजोवलयांकीत असा
तो प्रणव-स्वर
मन रुपी हंसाला
फारच मोहवतो...

देवाचिये द्वारी...
पाप-पुणण्याची गणना
होईल तेव्हा होईल...
जोवर श्वास चालतोय तोवर,
पुण्याचे सुवर्ण-कण वेचता येतील...

क्षण-क्षण मोलाचा
जर तो सद्कारणी
लावला जाईल...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!