कविता - 🌷 ' कोण जबाबदार ? '
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
जन्मापासूनच एकही गोष्ट, कर्णासाठी
सहजा-सहजी जणू नशीबातच नव्हती ...
अगदी माता-पित्याची छत्र-छाया असो ...
योग्यतेनुरुप, शिक्षण-गुरु मिळणे असो ...
प्रत्येक वेळी, प्रत्येक ठिकाणी," सूत-पुत्र "
असा शिक्का मोर्तब होत, हिणवलं जाणं ...
पूर्ण योग्यता असूनही, कमी लेखलं जाणं ...
कायम अपमानास्पद वागणूक प्राप्त होणं ...
गुरु द्रोणाचार्यांनी नाकारलेलं होतं त्यास,
धनुर्विद्यादी-युद्ध-कलांचे-प्रशिक्षण-देण्यास ...
तो निराश न होता, त्यांचेही-गुरु-परशुराम
यांचा शिष्य झाला-पण त्यांस खोटं बोलून ...
'ब्राह्मण' असल्याचं नाटक करावंच लागलं ...
मनात नसताही खोटं-सोंग वठवावंच लागलं ...
गुरु-प्राप्तीसाठी मना-विरुद्ध खोटंच बोलणं ...
की लोक-लाजेस्तव नवजाताचा त्याग करणं ...
कोणता-गुन्हा-मोठा, दोहोंत-कोण-अधिक-गुन्हेगार ?
माता-अर्भक-समाज-गुरु यापैकी कोण जबाबदार ?
दोषी कुणीही असो, सदा-शापित-फक्त-कर्ण-झाला
निष्णात-उदार-शूर-कर्णावर कायम अन्याय झाला
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply