कविता 🌷’ कोंडी ‘
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : बुधवार, २६ एप्रिल २०२३
वेळ : दुपारी, २ वाजून ४५ मि.
कधी कधी वाटतं आपणच आपल्या भोवती कुंपणं बांधतो
आपल्या विचारांना, मनाला, अंतर्गत शक्तींना बांधून ठेवतो !
स्वच्छंदीपणे, मोकळ्या आभाळात कल्पनांचे पंख पसरून
बिनधास्त होऊन मुक्तपणाने संचार करत, आनंदाने हरखून
खरा जीवन-अर्थ उकलूनही आयुष्यात उत्कर्ष होऊ देत नाही
मनाची कोंडी, अंतर्यामी-असंतुष्टी यांचा दोष कुणालाच नाही !
कोळी जसा भलं मोठं जाळं विणतो भक्ष्यांना पकडण्यासाठी,
पण कधी-कधी स्वतः त्यात गुरफटून, धडपडतो सुटण्यासाठी !
अशीच काहीशी विचित्र अवस्था होते भल्या-भल्या माणसांची,
कोषातून बाहेर पडण्याची केविलवाणी-जीवघेणी धडपड त्यांची !
स्वतः होऊन घातलेल्या बंधनांच्या-कर्तव्यांच्या ओझ्याखाली दबून
दिवसा-मागून-दिवस दवडून असहाय्यपणे निष्क्रिय जीवन जगून,
मोकळा श्वास घेण्याच्या, असफल स्वप्नांच्या-अनिद्रेत तडफडतो !
बंदी नसताना अदृष्य बंदीवासात, भ्रामक-कर्तव्यांचं-पालन करतो !
काय बरोबर, काय चूक या गहन प्रश्नांच्या गुंत्यात अडकून न पडता,
तीढे-पेच-सोडून आला क्षण पूर्ण न्याय देऊन, आला पाहिजे जगता !
सर्वांत दोषी कोण, स्वतः-कोळी, जाळं, त्याच्या भ्रामक समजूती ?
का सर्व बाजूंची बंधनांची कोंडी फोडून स्वतंत्र श्वास घ्यावा जगती ?
काय बरोबर, काय चूक या गहन प्रश्नांच्या गुंत्यात न पडता अडकून,
तीढे-पेच-सोडून आला क्षण पूर्ण न्याय देऊन, पाहिला पाहिजे जगून !
@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply