कविता - 🌷 ' कृष्ण-स्वरूप '
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - बुधवार, २७ मार्च २०२४
वेळ - दुपारी, १२ वाजून २ मि.
कृष्ण म्हणजे,
भान हरपून टाकणारी बासरीची सुमधुर साद ...
चरणा-या गाईंना, रममाण झालेल्या गोपींना,
गुंग आणि धुंद करुन देहभान विसरवणारी प्रेमाची हाक ...
कृष्ण म्हणजे,
मोहक रुपडं, चतुर संभाषण, बुद्धिमत्तेचं तेज ...
सूक्ष्म-तरल भाव-भावनांची दिलखेचक फेक ...
कृष्ण म्हणजे,
रंगीबेरंगी, सुगंधी फुलांचा उंचच उंच झुला ...
एक तत्वज्ञान, जगण्या-जगवण्याची एकमेव कला ...
कृष्ण म्हणजे,
करुन कालिया-मर्दन, लीलया उचलला गोवर्धन ...
दुष्टांचा, दुष्ट प्रवृत्तींचा विनाश अन् सुजनांना मार्गदर्शन ...
कृष्ण म्हणजे,
नीतीची अनीतीवर, चांगल्याची वाईटावर मात ...
टाहो फोडणा-या द्रौपदीला, मदतीचे लक्ष-लक्ष हात ...
कृष्ण म्हणजे,
अजाण-बाल-वयातही केला कारस्थानी पूतनेचा वध ...
क्रोधाला त्वरित घालावा आवर, हा बहुमोल बोध ...
कृष्ण म्हणजे,
बोकाळलेल्या अधर्म-अनाचाराची संपूर्ण विल्हेवाट ...
सोडून सुदर्शन चक्र, करी खलांचा, खलप्रवृत्तींचा निप्पात ...
कृष्ण म्हणजे,
प्रत्येकाच्या अंतरिच्या सात कप्प्यातील सत्य-शिव-आणि सुंदर ...
भाबड्या बाल-मुखातून प्रकटणारे ते विश्व-स्वरूप-मनोहर ...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
Leave a Reply