कविता - 🌷" काळ नावाचं औषध "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
महा-विचित्र प्राणी हा, माणूस नावाचा...
न सुटलेलं कोडं, त्या विधात्याला सुद्धा...
मानवी मन म्हणजे उनाड वानर...
चंचल, स्वच्छन्दि, बेछूट अनावर...
मानवी विचार जणू वळवाचा पाऊस...
वेळी अवेळी धो-धो-धो कोसळणारा...
कधी न पडता, दुष्काळाने रडवणारा,
कधी अतिवृष्टी-थैमानाने सर्वस्व नेणारा...
घटिका, पळे, दिवस पळतच राहतात...
जश्या मुंग्यांच्या ह्याs लांबलचक रांगा...
बघता-बघताच अवघं आयुष्यही सरतं,
कसं अन् कधी, कुणा कळतं का सांगा...
माणूस अति-हुशार-चलाख जरी असला,
तरी एकाच गोष्टीला तो घाबरतो खरा...
काळाचाच त्याच्यावरती प्रचंड दरारा !
जसा घोड्यासाठी चाबकाचा फटका,
माणसालाही बसतो काळाचा दणका...!
असा हा काळ माणसास खूप काही शिकवतो,
प्रथम आंबट-कडू-गोड रीत्या तो पोळून टाकतो...
अनुभवातूनच, सरते-शेवटी तो शहाणंही करतो...
काळ आणि वेळ आहेत अगदीच भिन्न ...
काळ आला चालून तर करतो छिन्नभिन्न...
वेळ आली चालून मात्र, वर्मीच घालतेे घाला
माणूस मनातच म्हणतो, "वेळ नव्हती आली,
पण अंगावर प्रत्यक्ष चालून, काळ होता आला"
सरते शेवटी काळ औषध सुध्दा बनतो...
विस्मृृतीनेे मनाची जळमटं साफ करतो...
दुःखाची झालर पुरती कातरून टाकतो...
वरुन आनंदाची उबदार शालही पांघरतो...!
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉🌅
Leave a Reply