कविता – 🌷 ” कस्तुरी-मृगावाणी “

कविता - 🌷 " कस्तुरी-मृगावाणी " 
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले

सौंदर्य अनेकानेक प्रकारचं असू शकतं ...
सृष्टीचं सौंदर्य तर कवी मनाला मोहवतं ...
व्यक्ति-सौंदर्यही विविधप्रकारांचं असतं...

पाहता क्षणी नजरेत भरणारं, बाह्य-सौंदर्य ...
नाकी-डोळी नीटस-सुडौल-बांधा-गौरवर्ण ...

रसरशीत, तजेलदार व्यक्तिमत्वाचं सौंदर्य ...
तजेलदार, निखळ, नितळ-कांतीचं सौंदर्य ...

देशा-गणिक कातडीच्या रंगांचं अप्रूप असतं ...
आशियाई लोकांना गोर्या रंगांचं कौतुक असतं ...

गोर्या लोकांना," टँन्ड-स्किन-टोन्सची" फार क्रेझ ...
आफ्रिकी लोकांना "लाईट-स्किन-टोन्सचं" अप्रूप
तसेच सरळ, चमकत्या, लांब केसांचा फार सोस ...

जेथे जे मुबलक असतं, त्याला नसतो काही भाव 
जे कमी प्रमाणात आढळतं, त्याचा मोठा बडेजाव
या सामान्य नियमानुसार, सौंदर्याला मिळतो वाव ...

व्यक्तिचं आंतरिक-सौंदर्य फार सूक्ष्म व तरल असतं
चित्रकाराचं एखादं मस्त चित्र खूप काही सांगून जातं
अथवा त्याच्या कुंचल्यातून साकारलेलं,भन्नाट पेंटिंग
कविमनातून उमटलेले अर्थपूर्ण-प्रवाही-उत्स्फूर्त शब्द
गायक-गायिकेच्या गळ्यातून साकारलेली सुरेल तान

माळरानी वार्यावर मुक्तपणे डोलणारं एखादं साधंसं फूल
एखाद्या वादकाच्या वाद्यातून निर्मित, अद्भूत स्वर-मंडल
एखाद्या पक्षाच्या गळ्यामधून उत्पन्न झालेला मंजुळनाद
सागराच्या भरती-ओहटीतून निर्माण झालेलं निसर्ग-चित्र
झुळुझुळु वाहत्या झर्यातून निर्मित-अफलातून नाद-ब्रह्म

प्रत्येक गोष्टीत, कृतीत, व्यक्तित, जीवात, अवयवात, सौंदर्य
निसर्गाच्या प्रत्येक कणा-कणात ओतप्रोत सौंदर्यच भरलेलं ...

ते जाणवून-समजू शकणारी कलासक्त-नजर अन् वृत्ती हवी
निसर्ग-दत्त सौंदर्याची आकंठ रसपान करणारी आसक्ति हवी
गरज आहे स्वच्छ, निर्मळ, सौंदर्य-दृष्टि असलेल्या अंतर्चक्षूंची

सच्ची सुंदरता हेरण्यास, सौंदर्य शोधक वृत्तीच हवी ...
सूक्ष्म सुंदरता टिपण्यास, सौंदर्यातूर रसिकता हवी ...

सुंदरता तर सुगंध-रुपात वसतसे, तुझ्या तनी-मनी ...
वेड्या मना, का असा तू शोधिशी-कस्तुरी-मृगावाणी ...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🌅

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!