कविता :🌷’ एक सुखद-हमी ‘


कविता :🌷' एक सुखद-हमी '
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

"बालपण देगा देवा" असंच काहीसं, सदा-सर्वदा सगळ्यांचं मागणं
खरं तर म्हातारपण हे देवानं मानवाला बहाल केलेलं दुसरं बालपण
सगळ्यांनाच नकोसं वाटतं आयुष्याच्या अखेरीस येणारं म्हातारपण
प्रत्येकासाठी अबाधित सत्य एकच,"जन्म-बाल्य-तारुण्य-वृद्ध होणं"

वृद्धांच्या-प्रश्नांकडे लक्ष वेधण्या,'जागतिक-जेष्ठ-नागरिक-दिन'सुरु झाला
हा दिन जागरुकतेने वयोवृद्धांच्या सामाजिक-योगदानाची दखल घेण्याचा
या निमित्ताने त्यांचे कौतुक-प्रशंसा करुन-त्यांना मनोबल,आधार देण्याचा
ज्यांनी निःस्पृहपणे योगदान दिले, त्यांचा सुयोग्य मान-सन्मान करण्याचा

पूर्वी वृद्धांची जबाबदारी असायची, महत्वाचे-कौटुंबिक-निर्णय घेण्याची
त्यांना मान देत-कुटुंबातील-सदस्यांना त्यांची आदरयुक्त भीती असायची
आता विभक्त कुटुंब-पद्धतीत पूर्वीचं चित्र पालंटून, दुसरंच टोक गाठलंय्
वडीलधाऱ्यांची औषधं संपल्यावर,कोणाचं त्याकडे साधं लक्षही नसतंय्
सांगून लक्ष वेधणं,स्वाभिमानी व्यक्तीला मरणप्राय-ओशाळं वाटू शकतंय्

जीवनाच्या संधीकाली त्यांच्या मूलभूत अपेक्षा,साध्या-माफक असतात
घरातील सर्वांनी हसत-खेळत, सुखी-आनंदी राहावं असंच त्यांना वाटतं
"हे देवा, मुला-नातवंडांना माझ्या वाट्याचंही दीर्घायुष्य दे" हेच मागतात
कोणी आजारी असलं की स्वतःला झोकून देत-देवाला साकडं घालतात

नव-पिढीवर सुसंस्कार व्हावे,फुटकळ कारणांनी घरी वितंडवाद न व्हावा
आयुष्यात टक्क्या-टोणप्यांनी-अनुभवांनी,त्यांनी शिकलेला असतो धडा
भांडणं करुन काही निष्पन्न न होता,हाती येतो अबोला-नात्यातील दुरावा
आपल्या चुकांची पुनरावृत्ती मुलां-नातवंडानी करु नये हीच त्यांची इच्छा

आयुष्यभराच्या चुकांच्या बोचर्या-जाणीवेमुळे वृद्धत्व नकोसं होत असावं
पश्चातापानं प्रायश्चित्त करावंसं वाटलं तरी देखील ते तितकंसं सोपं नसतं,
वेळ गेलेली असते व विशेष असं काही करण्यास शरीरही साथ देत नसतं

आयुष्यात स्वाभिमानी-स्वावलंबींना देहानं अन् मनानं, वृद्धत्व "झुकवते"
इच्छा नसतानाही सतत लहान-सहान गोष्टींकरिता, मदत घ्यावीच लागते
मग काळाच्या-ओघात "आपण फार मागे पडतोय" ही मानसिकता होते
'मानसिक-शारिरीक-दुर्बलतेच्या-वृद्धपणाची' हीच हमखास खूण असते

घरोघरी सगळे लहानांशी शाळेतील गंमतींबद्दल आवर्जून गप्पा मारतात,
पण घरातील वृद्धांची विचारपूस न करता, त्यांना अधिकाधिक टाळतात
याच वयोवृद्धांनी काडीकाडी जमवून घरकुल उभारलं ही गोष्ट विसरतात

त्यांच्याशी वेळ काढून कधी मनमोकळ्या गप्पा मारल्या तर काय बिघडलं ?
कारण हीच व्यक्ती आहे, जिने घरच्या प्रत्येकासाठी जीवाचं रान होतं केलं
ही तीच व्यक्ती आहे जिने रात्रीचा दिवस करुन घरा-दाराला होतं सांभाळलं
तीच व्यक्ती आहे जिने पोटाला चिमटा घेत लाड पुरवले-कोड-कौतुक केलं

वृद्धत्वाने ना माणूस बदलंत,त्याचं कर्तृत्व-ऋण कणभरानेही कमी होत नाही
आयुष्याची संध्याकाळ कुणालाच कधी चुकलेली नाही-पुढेही चुकणार नाही !
आजची तरुण पिढी भविष्यात म्हातारी होणार,ही टाळून टळणारी गोष्ट नाही
आयुष्याच्या-खेळाची-गोम ही की,"आजचे तरुण,वृद्ध होणारेत कधी-ना-कधी"

वर्षातला एक दिवस 'ज्येष्ठ-नागरिक-दिन' म्हणून साजरा करणं चांगलं आहे,
पण त्यापेक्षा कायम,त्यांनी केलेल्या कामाचं-कष्टांचं चीज होणं गरजेचं आहे
तसा मन:पूर्वक-सक्रिय-प्रयत्न व किमान-प्रयास करायला काय हरकत आहे ?
संधीकाली-जरुरीची आहे सुखद-हमी,की"त्यांची काळजी करणारं कुणी आहे"

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!