कविता - 🌷 " एक-एक-थेंब "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
म्हणतात, थेंब-थेंब-जमूनच तळे साचते
सप्तरंग-सप्तसुर ते आपल्या आयुष्याचे...
सतत चालणारा खेळ, हा सुखदुःखाचा
आनंद अश्रूंनी एकेका थेंबाचे रूप घेता...
एक थेंब आयुष्याच्या पानावर विसावला
सुंदर, सुरेख नक्षी कोरून मनाला भावला...
बघता-बघता कळत-नकळतच ओघळला
एक थेंब ओंजळीत अलगदपणे झेपावला...
मनातल्या मनात हसवत गुजगोष्टी करणारा
एक थेंब क्षणिक सुखाने आनंदित करणारा...
वसंत पंचमीचं कोवळं उन्ह अंगावर घेणारा
एक थेंब पावसात लपंडाव खेळत रमणारा...
एक थेंब जमिनीवर पडून पाझरत जाणारा
एक थेंब विरून जाण्याआधी पूर्ण जगणारा...
आठवणींच्या विश्वात चिरंजीव चिरंतन झरा
एक थेंब जीवन-सागरामध्ये एकरूप होणारा...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🌅
Leave a Reply