कविता : 🌷’ ऋणानुबंध ‘

कविता : 🌷' ऋणानुबंध '
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : रविवार, २६ मे २०२४
वेळ : संध्याकाळी, ७ वाजून ३० मि.

आज फारच ओकंबोकं-सुनं-सुनं वाटतं आहे
जणूकाही घरात, सगळं-काही बिनसलं आहे

दर-रोज सदैव माझ्या नजरेसमोर असणारा
माझ्या अंतर्मनाला सततची सोबत करणारा

डोळ्यांना थंडावा देत हळूच मन-मोहवणारा
चहा-पाणी पिताना-खाताना-टिव्ही बघताना

मी सुखात असो वा दु:खात, मूक संवाद चाले
काहीही न सांगताही त्याला सर्वकाही आकळे

समोर तो मूकपणे कायम उभा-साथ द्यायला
आज त्याजागी कोणी नाही आपलं म्हणायला

त्याचा कुणा काहीच त्रास नव्हता काडी इतका
मग का उगा असे उखडून, फेकून दिले त्याला ?

जीवनात कशाचाही भरवसाच नाही, हे पटलं
शांत व्रतस्थ वृक्षाने कुणाचं काय हो बिघडवलं

पानगळ सहन करुनही न चुकता तो बहरायचा
थंड-शितल-सावली देऊन शांत बघत राहायचा

त्याचं अस्तित्व हा आयुष्याचा अविभाज्य भाग
त्याच्या साक्षीने क्षणात फुलायची सुखाची बाग

तो नसताना आनंद कसा दुथडी भरुन वाहणार ?
माझ्या हिरमुसल्या मनाला कोण उभारी देणार ?

त्याचे अन् माझे नक्कीच ऋणानुबंध असावेत
एरव्ही असे ढळ-ढळ अश्रु का बरं ओघळावेत ?

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!