कविता : 🌷’ ऋणानुबंध ‘

कविता :🌷’ ऋणानुबंध ‘

कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले 
तारिख : मंगळवार, ११ एप्रिल २०२३
वेळ : संध्याकाळी, ७ वाजून ४४ मि.
असं म्हणतात माणसांचं भेटणं,
खूप त्या आधीच ठरलेलं असतं
कुठे, केव्हा, कसं तपशीलासकट!
फक्त त्या व्यक्तिंना ते माहीत नसतं !!
अचानक कोणी, काही कारणानं
आपल्याला भेटतो, निकोप मनानं
अनोळखी असूनही कामानिमित्तानं 
अन् हाताखाली नोकरी करु लागतो 
सुशिक्षित, कामसू आणि विनम्रता 
पडेल ते काम करण्याची तत्परता 
बघता बघता बराच काळही लोटतो
कामाचा अविभाज्य घटक बनतो!
सोपवलेली कामं तो चोख बजावतो
मग ती घरची असोत वा ऑफीसची
घड्याळाच्या काट्यांकडे दुर्लक्ष करुन
न सांगताही जबाबदारीनं पार पाडतो 
अत्यंत आदरानं, त्याचं वागणं-बोलणं 
नजर झुकवून, कान टवकारुन ऐकणं,
कामांचा तपशील समजून, नीट करणं
कैक दुर्मिळ गुण असूनही नम्र असणं !
“कठीण समय येता कोण कामास येतो?”
विपरीत स्थितीतही प्रामाणिक जो राहतो
त्यावर टाकलेल्या विश्वासाला जो जागतो 
आपत्कालीन संकटांना बेधडक तोंड देतो !
जणू आयुष्याचा कार्यभार उरकून टाकून,
हल्लीच तो हे जग सोडून गेल्याचं कळलं !
ना नात्याचा ना गोत्याचा, पण दु:ख वाटलं,
वाटतं काहीतरी नक्की असावा ऋणानुबंध !
@तिलोत्तमा विजय लेले 
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!