कविता : 🌷 ‘ उसनी हिम्मत ‘ तारिख : १७ फेब्रुवारी २०२३

कविता : 🌷 ‘ उसनी हिम्मत ‘

कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले 
तारिख : शुक्रवार, १७ फेब्रुवारी २०२३
वेळ :. रात्री, ११ वाजून १८ मि.

सगळं काही ठीकठाक असताना
दुधात मीठ पडावं तसं काहीसं व्हावं,
अधिकाधिक सुखाच्या हव्यासामुळं,
हातचं सारं, उगाच निसटू लागावं !

दुरुन डोंगर साजिरे किती भासतात,
जवळून मात्र ओबडधोबड दिसतात …
” ज्याच्या वंशा जावे तेव्हा ते कळे !”
एरवी सदैव ‘पर दुःख शितल’ वाटते !

आला दिवस-गेला दिवस, गणती नाही
काय करावं, कसं वागावं, थांगच नाही …
बिघडत चाललेलं दिसूनही वळत नाही,
धरलं तर चावतं अन् सोडलं तर भुंकतं !

दुखरी नस कोणती ते शोधून न काढून
उपाययोजना करण्यात दिरंगाई करुन,
आजचं मरण उद्यावर ढकलून देऊन,
नक्की असं काय साध्य होऊ शकतं ?

गाढ झोपलेल्याला सुध्दा उठवता येतं
पण डोळ्यांवर खोटी-नाटी झापडं बांधून
झोपेचं सोंग वठवणा-या दिशाहीनाला,
वठणीवर आणायला सोळावं रत्नच हवं !

बिकट वाट वहिवाट नसावी हे समजूनही
हातावर हात ठेवून बसणं, स्वभावात नाही
कंबर कसून पदर बांधून पाऊल पुढे टाकून,
हीय्या करुन लढायला, उसनी हिम्मत हवी !

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆















Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!