कविता – 🌷 ” उदारतेचा-महामेरू-कर्ण “

कविता - 🌷 " उदारतेचा-महामेरू-कर्ण "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले

कर्ण, वास्तविकत: कुंतीचा ज्येष्ठ पांडव-पुत्र
सर्वच बाबतीत महा-तेजस्वी-ज्येष्ठ अन् श्रेष्ठ

कर्म-धर्म-संयोगाने चुकीची बाजू घेतल्यामुळं,
कर्णाचा पराजय व अंततः मरण होतंच अटळ

पण त्यामुळे त्याचे सद्-गुण नाहीसे नाही होत
उलट, कधीच बसला नाही नशिबाला दोष देत

स्वतःच्या हिम्मतीवर, शारीरिक-मानसिक बळ
पणाला लावून आयुष्याची रोवली,भक्कम मेढ

खरा-खुरा" नायक "असून, दैव-जात करणीनं,
त्यास हकनाहक गैररीत्या शापित सिध्द करुन

काळ्या रंगात, खलनायकच बनवायचा प्रयत्न
फारच तुटपुंजा, केविलवाणा आणि हास्यास्पद

जोवर पृथ्वीवर मनुष्य जीवन राहील सुस्थापित
कर्णाचं कर्तृत्व-उदारपणा कायम-राहील-स्मृतीत

जन-मानसात तळपत-झळकत राहील स्मरणात
विशाल-मनाचा-कर्ण संपूर्ण विश्वात, उदारपणात

कायमचा कोरला गेला आहे तो तेज:पुंज-सूर्यपुत्र
कर्णाची उज्वल स्मृती न पुसणार कधीच कुरुक्षेत्र

कर्णाच्या वाट्याला सदैव फसवणूक आली तरी,
सतत चांगले वागण्याचीच त्याने पराकाष्ठा केली

कुणालाही विन्मुख न पाठवून, शब्दाला जागला
मैत्रीला-पुत्र-धर्माला-दिलेल्या-वचनाला जागला

छलकपटाने तो लौकिकार्थाने जरी मृत्यू पावला,
तरी खऱ्या अर्थाने, तो मरुनही अजरामर झाला

अशा या"न- भूतो-न- भविष्यती" वीर योद्धयाला
अजात-शत्रू-उदार-कर्णाला त्रिवार मानाचा मुजरा

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!