कविता 🌷 " इतिहास असा रचला "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
मासेर्लिस बंदरात ज्यांनी इतिहास असा घडविला,
भारतीय शूर स्वातंत्र्य-सेनानी, हातोहात सटकला
बंदीवान देह तरी दुर्दम्य इच्छा-शक्तीचा वरद-हस्त
मैलोनमैल दूर किनारा, उत्तुंग देशभक्ती-जबरदस्त
रात्रीच्या मिट्ट काळोखात बर्फाळ शीतल पाण्यात,
भरतभूचा-सुपुत्र, लोखंडी बेड्या तोडून झटक्यात
मातृभूमीच्या संरक्षणार्थ, घेऊन तळ हातावर शिर
कडाक्याची थंडी, झोंबणारा वारा, जायबंदी शरीर
मार्से किनारा गाठण्यासाठी अति प्रचंड होतं अंतर
विजेच्या वेगानेच पार केलं पोहत सपासप निरंतर
शौर्याचा तो सम्राट, मनोबलाने अति समर्थ खंबीर
शरिर बंदी असूनही कणखरपणाने तोडली जंजीर
योजल्याप्रमाणे लावून इच्छाशक्ती सर्वतो पणाला,
पोहत-पोहत थेट फ्रेंच किना-यास वेळी पोहोचला
तब्बल ११५ वर्षांपूर्वी जीवाची-जराही-पर्वा-न-करता,
न भूतो न भविष्यति असा महापराक्रम, त्यांनी केला
स्वा. सावरकरांचा ज्वलंत देशाभिमान, जगी गाजला
स्वातंत्र्यासाठीचा हा-प्रखर-लढा विश्वभरात दुमदुमला
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply