कविता – 🌷 ‘ आशेचा किरण ‘
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – २२ डिसेंबर २०१९
माणसं अशी का बदलतात ?
कोडं बनून गोंधळ घालतात …
सगळे उच्च कोटीचेच सद्गुण,
हकनाक वाया का घालवतात ?
राजबिंडं रूप, कुशाग्र बुद्धी …
वाक्-चातुर्य-स्वभाव-विनोदी,
राजस हावभाव-सदैव आनंदी …
पिंजर्यात अडकून, झाला बंदी !
एकवेळ गंमत-गंमत म्हणून …
स्वत:च भोवती जाळं विणून,
बेसावध क्षणी मग गुरफटून …
नकळत नौका जाई भरकटून …
धोक्यात जीव का टाकतात ?
बरं-वाईट काहीं ना उमजून,
वाईटाची कास का धरतात …
सुखाकडे पाठ का फिरवतात ?
एका क्षणी प्रेमानं बिलगून …
हळव्या मना, का दुखवतात ?
पोटतिडकीनं सांगून सुद्धा,
काणा-डोळा का करतात ?
रक्तबंबाळ विषण्ण झालं मन …
काय करावं-विचारांचं रणकंदन …
वणवा पेटला-कुठं शोधावं चंदन …
रात्र सरता, दिसे आशेचा किरण …
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply