कविता - 🌷 ' आली आली चैत्रागौर माहेरी '
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
तारिख - शनिवार, १३ एप्रिल २०२४
वेळ - संध्याकाळी, ५ वाजून २१ मि.
चैत्र शुक्ल तृतीयेला, सर्व आवरा-आवर झाली
आली आली गौराई गं आज माहेरा ती आली
करुया गं पितळी-पाळण्यात, गौराईची स्थापना
कैरीचे पन्हे आणि आंबा-डाळ नैवेद्यास अर्पणा
तिला न्हाऊ माखू घालू व चंदनाची लावू उटी
फळं, भिजल्या हरभ-यांनी, भरुया तिची ओटी
शेणाने सारवल्या अंगणी चैत्रांगणाची गं शोभा
माहेरच्या कौतुकाची गौराईच्या, मुखावरी आभा
मुलीबाळी-सुवासिनी नटल्या-सजल्या सर्वजणी
चैत्रगौरीच्या-समोरी शोभिवंत आरास व मांडणी
हळदी-कुंकवाचा समारंभ संपन्न होतो घरो-घरी
पुरणा-वरणाच्या स्वयंपाकाने तृप्त होई चैत्रगौरी
बघता-बघता एक मास गौराई-सुखावली, माहेरी ...
भिजल्या डोळ्यांनी निरोप घेत, परतली चैत्रगौरी ...
भिजल्या डोळ्यांनी निरोप घेत, परतली चैत्रगौरी ...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
Leave a Reply