कविता : 🌷' आयुष्याचं गणित '
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : २७ एप्रिल २०२३
वेळ : दुपारी, १२ वाजून ११ मि.
आजवर नक्की काय मिळवलंय आणि काय राहीलंय बाकी
सविस्तरपणे गणित मांडून आता वसूल करुया की थकबाकी
काही गोष्टी कळत-नकळत, तर बेफिकीर वृत्तीनं सुध्दा काही
आपल्याच हातून घडलेल्या घटना, कृत्यं भूतकाळातील पूर्वी
साक्षीभावाने त्यांकडे पाहता, आज त्या घटना वाटती नगण्य
रंगहीन चित्रासमान वाटती फिक्या-कस्पटासमान प्रभावशून्य
वाटतं, उगाचच त्यांना अति महत्वपूर्ण मानून आपण झुंजलो
आणि हकनाक त्यांना अवाजवी महत्व देत मनातच, खंगलो
मनात अढी बाळगून, सुखदायी क्षणांना पारखे आपण झालो
मन पोखरुन ' राईचा पर्वत करुन 'विनाकारण भरकटत गेलो
क्षुद्र-क्षुल्लक गोष्टी डोळे-झाक करुन जगणे, हीच कला आहे
सुख-मन:शांति टिकवून ठेवण्यासाठी, ती अत्यावश्यक आहे
" उथळ पाण्याला खळखळाट फार," तारुण्याचा उसना जोश
आयुष्याच्या रम्य सांज-वेळी जाणवतं, ते होते आपलेच दोष !
सुखाला गुणून-क्रोधाला भागून, दुःखास देता येतो मस्त डच्चू
इतपत जरी गणित जमलं तरी जीवन पूर्ण-सफल होईल बच्चू !
@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply