कविता :🌷’ आनंद मावेना ‘
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : बुधवार, ९ ऑगस्ट २०२३
वेळ : दुपारी ४ वाजून ४१ मि.
गोप-गोपिका सार्या जमल्या घरोघरी
श्रावणसरी गं आल्या या नाचत दारी
पहिल्या-वहिल्या वर्षावाने सुखावली
सृष्टीच्या हृदयी प्रीत-वेल ही अंकुरली
पक्षी-पिलं, मुलं-बाळं हर्षाने बागडली
पर्जन्याच्या येण्याने जणू जादू झाली !
जिकडे तिकडे ही उधळण शत-रंगांची
नजर जाई तिथवर पखरण सौंदर्याची
डोळे मिटता नाना-फुले गंध दरवळती
गुंजारव करीत भ्रमर कमळांना शोधती
भरधाव वेगे प्रेमातुर-नद्या धावती सागरी
जल भरणा राधिका निघाली यमुना-तीरी
चाहूल ऐकता भेटण्यास थेट गेला मुरारी
खूण म्हणून कान्हा छेडी हलकेच बासरी !
मनसोक्त आनंदाची नितांत सुंदर बरसात
प्रत्येक जन-जीव-तृप्त, होऊन बिनधास्त
मृदू-रेशमी-कोमल-स्पर्श मोरपंख मुकुटात
हरि दिसता, राधेचा आनंद मावेना हृदयांत !
@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply