कविता- 🌷 ‘ आदिमाया-मुक्ताबाई ‘
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – २९ फेब्रुवारी २०२४
वेळ – दुपारी, ४ वाजून १३ मि.
निंदा, उपेक्षा सहूनही, आत्म-सामर्थ्याची तेजोमय वाटचाल…
स्वतःसह सर्वांस तारुन चार-भावंडांनी दिव्यज्ञान केले बहाल !
मुक्तेची जन्मजात-जिज्ञासा, अलौकिक प्रतिभेने तेजाळलेली
ज्ञानेश्वरांच्या खांद्यास खांदा लावून अध्यात्मिक धुरा वाहिली !
‘संन्याशाची-मुलं’म्हणून बहिष्कृत-अवहेलनेमुळे चिंतामग्न…
निर्गुणाचा स्तर गाठून, स्वसाधनेच्या फल-स्वरुपे आत्ममग्न !
लोकांची हेटाळणी सहूनही-भावंडाना आत्मतेजाची झालर …
भावंडात लहान मुक्ताईंनी, पोक्तपणे घातली मायेची पाखर …
ज्ञानेश्वरांच्या बोधामृताने उघडली, मुक्ताईंची ज्ञान-कवाडे …
आजपावेतो भारतभूमीत अभिमानाने गाती त्यांचे पोवाडे …
निर्जीव-भिंतीवर बसून स्वागतास आले ज्ञानदेव, विनाकष्ट
हे पाहून खजील-चांगदेवांचा गर्व चूरचूर होऊन झाला नष्ट !
खजील चांगदेव नत-मस्तक, घेतली-लोळण-ज्ञानेश्वर-चरणी…
“यासी करा आत्मज्ञानी” म्हणंत, मुक्ताईंकडे केली पाठवणी !
मुक्ताबाईंची थोरवी अगाध-त्यांचे अपरंपार योग-सामर्थ्य-बळ…
मुक्ताबाई शेंडेफळ असूनही सर्वांसाठी माया-ममतेची तळमळ
कृतकृत्य-शिष्य चांगदेव-परतून समाजाभिमुख होणे शिकले…
मुक्ताबाईंच्या ज्ञानबोधाने स्वकोषाच्या परिघातुन बाहेर पडले…
मुक्ताबाईंकडून निज-बोध मिळून, चांगदेवांना-जीवन-मुक्ती !
अज्ञानी-चांगदेवांना “चांगदेव पासष्टी”समजून, ज्ञान-प्राप्ती !
ज्येष्ठ भ्राता निवृत्तीनाथ, ज्ञानदेव अग्रेसर आध्यात्मिक क्षेत्रात…
भयंकर-विपरीत स्थिती येऊनही, अत्यंतिक प्रेम सर्व भावंडात !
मुक्ताईंची तुर्यावस्था-बहिण-भावांच्या मायेचा तो सुवर्णकाळ…
यात्रा-गमन अमान्य करुन भावा-बहिणीचा वियोग दिर्घकाळ…
ज्ञानदेव-मुक्ताबाईंमध्ये मतभेद असले, तरी नव्हती मतभिन्नता…
बहिण-भावात, आध्यात्मिक-पारमार्थिक एकसमान समरसता…
गतकालीन आठवणी जाग्या होऊन येतो उमाळा, दाटतो गळा…
निवृत्ती-ज्ञाना-सोपान व मुक्ता या भावंडातील अपार जिव्हाळा !
आदिमाया मुक्ताई-कृपेने जीवन-मुक्त होत, लागेल जन्म-सार्थकी…
परमार्थात संपूर्णपणे झोकून-समर्पण करणे, ही आहे खरी युक्ती !
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply