कविता 🌷 ‘ अविस्मरणीय अनुभव ‘ तारिख – २० जुलै २०१७

कविता – 🌷 “अविस्मरणीय अनुभव “…  
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले 
तारिख – गुरुवार, २० जूलै २०१७ 

भल्या पहाटे उठून शुचिर्भूत होऊन, थेट
देनाली नँशनल पार्कला, दिली होती भेट

सेन्टरला जाऊन देनालीची बस पकडली
अगदी वेळेवर वक्तशीरपणे बसही सुटली,  

ते निसर्ग सौंदर्य इतकं होतं नजर-फोड, 
काय अन् किती पाहावं असं झालं होतं 
सगळं दृश्यच होतं अविस्मरणीय-अजोड 

इतक्यात झाडीतून चक्कं अस्वलांची जोडी,
बाहेर पडून भर रस्त्यातून चाललेली दिसली …

अंदाजे पाचशें किलो-देहाला आवरत-सावरत 
खाली मुंडी घालून चालले होते त्यांच्याच मस्तीत 

लगोलग बसच्या काचा फटा-फट झाल्या बंद
आवाज न करता चिडीचूप, सर्वच एकदम शांत 

ते दोघेही रस्ता संपूर्ण ओलांडून जाईपर्यंत
सगळ्यांचे कँमेरे, कँमकॉडर झाले कार्यरत 
क्लिक-क्लिक-क्लिक शटर्सची उघड-झाप 

शेवटी सुशागात रमत-गमत त्या जोडीची स्वारी
मंद लयीत आरामात, पोहोचली एकदाची पैलतीरी 

नंतर नीलगाय आदी जंगली प्राण्यांना बघत-बघत
वनराईत हिरवी भरगच्च घनदाट झाडी-झुडुपं पहात

डोळ्यांनीच घेता येईल तितका सृष्टीचा आस्वाद घेत,
बॅक-पॅक मधून खात-पीत हळू-हळू घाट चढत-चढत, 

पोहोचलो उंच जणू प्रति स्वर्गा-समान
बर्फाच्छादित कडी-कपार्यांची कमान 

निसर्ग-राणीने साज-शृंगार करून
लाडिकपणे हातांची मिठीच घालून

पिंगा घालत गोलाकार फेरा धरून, 
सप्त-रंगांची अनिर्बंध-स्वैर उधळण …

हिरव्या रंगांच्या इतक्या छटा,एका ठिकाणी 
सृष्टि-सौंदर्यानं नटलेली ती अवखळ धरणी 
स्वर्गीय बहार, स्वत:च उतरली जणू अंगणी 

निळं-निळंसं निरभ्रं, अथांग आभाळ 
ढगांशी लपंडाव खेळणारं, लडिवाळ
झळकतंय देनालीचं उंचच उंच भाल 

देनाली म्हणजे अमेरिकेचं जणू” एव्हरेस्ट “
बघून हिमालयाची आठवण झाली” बेस्ट “

त्याच्या बरोबरच्या प्रेक्षणीय पर्वत-रांगा 
सूर्य-किरणांनी रंगवलेला अद्भुत नजारा

झुळू-झुळू वाहणारा सुखद वारा 
वन्य-जीवनाच्या त्या साक्षात्कारा
केला शत-शतदा मानाचा मुजरा …

यानंतरचं चित्त-थरारक अनुभव-वर्णन
नक्की करूया,कवितेच्या दुसर्या भागात

🌷@तिलोत्तमा विजय लेले 
🙏🕉️🌅


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!