कविता - 🌷 ‘ अमृताचे क्षण ’
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
अगतिक तू अन् अगतिक मीही !
प्रत्येकाची अगतिकता वेगवेगळी
कुणी वात्सल्याने
तर कुणी कर्तव्याने!
कुणी अंधपणाने
तर कुणी व्यसनाने !
कुणाला पैशाची नशा
तर कुणा मी-पणाची !
कुणाला सौंदर्याचा माज,
तर कुणाला पदाचा !
क्षणभंगुर अशा जीवनात
कशाला हवेत थाट नी माट ?
छोट्या-मोठ्या सुखांनीच,
तर भरून जातं आपलं ताट !
अल्याड वसली ईवली दुनिया
पल्याड खुणावते मोह-माया !
आभाळ जेंव्हा येतं भरून,
नकळत हळवं होतं माझं मन !
भूतकाळाचा पश्चात्ताप,
अन् भविष्याचे फोल वेध
नाही दोन्ही कामी येत,
म्हणून वर्तमानाचे हवे बेत !
सुख म्हटलं की सुख मिळतं !
कुरबुर करुन दूधही नासतं !
आहे तेच अमृत मानून,
अनुभवावेत क्षण-न्-क्षण !
🌷@ तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉🔆
Leave a Reply