कविता : 🌷’ अपार महती आईची ‘

कविता :🌷’ अपार महती आईची ‘
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : १४ मे २०२३
वेळ : १२ वाजून २२ मि.

महासागराहूनही अति-विशाल असं जिचं काळिज
अन् मऊ लोण्याहूनही मृदू-मुलायम असं जिचं मन,
भयंकर-भयाण काळ्या रात्री मनाचा हिय्या करुन,
तान्हुल्यासाठी पार करते, टकमक-टोक-जीवघेणं !

मोडेन-पण-वाकणार-नाही हा तिचा पक्का निर्धार
वाट्टेल ते झालं तरी इकडची दुनिया तिकडे करणार !
“मेरी झांशी नहीं दूंगी” म्हणंत शत्रूला ललकारणार 
दत्तक-पुत्राला पाठीशी बांधून, घनघोर रण लढणार !

आधुनिक काळातही तान्ह्या बाळाला पाठीवर बांधून,
बांधकामात मोलमजूरीही करुन कुटुंबाचा गाडा रेटते !
संसाराला थोडा हातभार लागावा म्हणून नोकरी करुन
नाईलाजाने मध्यमवर्गीय-आई, थेट पाळणाघर गाठते !

गर्भवती असताना पतिने अरण्यात सोडुन दिल्यावरही,
सीतेने पुत्र लव-कुश यांना घडवले, प्रतिकूल स्थितीतही !
शंभर पुत्रांची माता गांधारी, पुत्राला अमर करण्यासाठी, 
तिनं आयुष्यभराची पतिव्रतेची पुण्याई पणाला लावली !

नटखट-नटवर-खट्याळ कान्ह्याचं लालन-पालन करणारी,
यशोदा मैया लाड पुरवूनही त्याला शिस्तपालन शिकवणारी !
अनाथ-अपंग-दुबळ्या-दुर्दैवी-जीवांना “आपलं” मानणारी,
दीन-पोरक्या-रोगग्रस्त-समस्त-जनांची ‘मदर तेरेसा’ झाली !

अत्यंत विपरीत स्थितीतही मुलांवर सुसंस्कारांचे पैलू पाडणारी
“माणुसकीनं कसं जगावं” याचा मूलमंत्र देणारी-श्यामची आई !
संकटाची चाहूल लागता, मुला-बाळांवर आचही येऊ न देणारी 
काय काय अन् किती किती सांगणार मातृ-दैवताची मातब्बरी ?

स्वधर्म-रक्षणासाठी, जनतेवर होणारा अन्याय रोखण्यासाठी 
आई-भवानीच्या साक्षीने स्वराज्य-स्थापण्याची प्रेरणा-देणारी,
छत्रपती शिवरायांच्या-आई-जिजाबाईंची असामान्य कामगिरी 
या सर्व माऊलींच्या नामोल्लेखाशिवाय कविताही राहील अधुरी !
या सर्व माऊलींच्या नामोल्लेखाशिवाय कविता राहीलच अधुरी !

@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆






































Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!