कविता :🌷 ‘ अनमोल नर-रत्न ‘

कविता :🌷 ‘ अनमोल नर-रत्न ‘

कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : सोमवार, १० जुलै २०२३
वेळ : दुपारी १ वाजून ३१ मि.

जन्मत:च अत्यंत बुद्धिमान निव्वळ तेरा वर्षांचं वय असताना,
स्वतंत्रतेचं स्त्रोत्र-स्वदेशीचा फटका-सारसंग्रहादी अद्भुत रचना !
इतकी अथांग देशनिष्ठा की निष्ठेलाही किंचित संकोच वाटावा
इतकं निडर-अगाध-देशप्रेम की बर्फाळ पाण्याला घाम फुटावा !

बंदीवासात कोलूच्या-बैलांऐवजी जुंपून तेल काढावं लागलं !
राब-राबून-काबाडकष्ट करुन अर्धपोटी-स्थितीत लेखन केलं !
अंदमान-काळकोठडीत हरप्रकारे छळले खड्या बेडीत टांगले,
तेल-घाण्याला जुंपले-नारळाचा काथ्या कुटण्याचे कामही केले

कारागृही लेखणी नसताना रात्रभर कोळशाने भिंतीवर लिहून, 
ते पक्कं स्मरणात बंदिस्त ठेवून, पुसून, नवीन लेखन करायचं !
रोज त्याच कृतीची पुनरावृत्ती करुन त्यांनी एक-दोन नाही तर,
तब्बल दोन हजार ओळींचं ‘कमला’ हे महाकाव्यं होतं लिहीलं !

अंदमान-कारागृही बाभळीच्या काट्याने भिंतीवर कोरुन लिहीलं,
‘Essentials of Hindutva’ या अप्रतिम ग्रंथाचं लिखाण केलं !
देश-स्वातंत्र्य-प्राप्ती अन् ते मिळवल्यावर देशाच्या सुराज्यासाठी,
रात्रं-दिवस अतोनात, अविश्रांत परिश्रम घेऊन केली जन-जागृती !

खरोखरचे द्रष्टा असल्याने जातिभेद निर्मूलनासाठी अस्पृश्यांसाठी,
आंतरजातीय-लग्नं लावून-‘पतित पावन मंदिरं’ उभारली सर्वांसाठी
सामाईक भोजनालयं सुरू करुन जातिभेद समूळ नष्ट करण्यासाठी, 
भारतभर सर्वत्र सहभोजनाचा धडाका उडवून दिला सर्व-जनांसाठी !

मृत्यूलाही न जुमानता निडरपणे ध्येयाच्या ध्यासाने वाटचाल केली
भयंकर सागरी उडी घेऊन बर्फाळ पाण्यातून पोहत किनारा गाठला
उभं-आयुष्य क्षणाचीही उसंत न घेता, देश-हितासाठी अखंड झटले 
अंती ८३ व्या वर्षी प्रायोपवेशनाचा निर्णय घेऊन अन्न-पाणी त्यागले !

परिणामी, २६ फेब्रुवारी १९६६ त्यांचे पंचतत्त्वात विलीन झाले प्राण
हा स्वातंत्र्य-क्षितिज-रवी हीच भारत-भूची अस्सल अनमोल खाण !
बाजीप्रभू देशपांडे-वचन ‘लाख मरोत पण लाखांचा पोशिंदा न मरो’ 
त्याच धर्तीवर 
कुणी असो-वा-नसो, निष्ठा जिवंत ठेवणारे ‘स्वातंत्र्यवीर’ हृदयी वसो !

@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!