कविता – 🌷 ” अद्वितीय जोड “

कविता - 🌷 " अद्वितीय जोड "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले

भल्या पहाटे डोळे उघडण्या पूर्वी
मखमली सूर फुंकर मारुनी ऊठवी ...
डोळे मिटलेले-उठती तरलशा लहरी
सर्वांगी सरसरे, गोड अशी शिरशिरी ...

ही कसली उठतेय ऊर्मी मनांतरी...
विलक्षण असुनी वाटे हवीहवीशी ...
मनात तृप्ती, मग कान का अधाशी ...
फिरफिरुनी सूर रुंजी घालती मनाशी ...

दुरून मधुर वेणू-नाद भुरळ घालीतसे
मन राधा बनून, जणू त्याकडे धावतसे ...
सूर-वेडी राधा अमूर्तालाच शोधत बसे ...
अंतरीं तिच्याच तो अगम्य-स्वर लपलासे ...

नभात कोणता असे हा तारा ? खुणावतो, चमचम करी बावरा ...
धावे अकारण मन नदी-तीरा, मोह-मायेचा जणू खेळ हा सारा ...

निसर्गातिल सूक्ष्मातिसूक्ष्म नाद-सदा देती हळुवार प्रतिसाद ...
शांत आसमन्ती होई चलबिचल-पक्षांची मधाळ किलबिल ...

झाडा-झाडातून वारा येई वाजवीत शीळ
कोणी टाकली, चमकत्या आभाळी नीळ ?
नकळत मनोमनी कोणी ही घातली भूल ?
कोण जाणे राधेला असं कसं लागंलं खूळ ?

ऐकूनी श्री हरिची मधुर मुरली, वेडी राधा घर-दार विसरली ...
जणू तहान-भूकही सारी सरली-नकळत सर्व देह-भान हरपली ...
सहज अलगद राधा-राधा-राधा, "धारा-धारा-धारा" बनली ...

जुळले-जुळले वाटती, नाजूक कोमल धागे ...
कोण असे तो वीणकर, काहीच कसे ना उमगे ?
हा भास, स्वप्न कीं सत्य, का ना कुणी मज सांगे ?
बिंब दिसे प्रति-बिंबा, चाहूल कशी मग न लगे ?

कातरवेळ झाली अन् लागते अनावर ओढ ...
जणू वेडया राधेची, खट्याळ कान्हा काढी खोड
सांज-लालीमा पसरुनी, गाली दिसतसे गोड ...
द्वैत आणि अद्वैताची, अद्वितीय अशी ही जोड

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!