कविता 🌷 " अजूनही "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले
अंधुकसं-ठिकाण ते एक स्वप्नात पाहिलेलं,
पूर्ण पृथ्वीगोलावर कधी न सापडू शकलेलं...
तरीही अधीर-वेडं-मन अजूनही शोधते आहे...
वैशाख-वणव्यात सारं-सारं होरपळून गेलं,
तरीही धुगधुगत्या-आशेला लाल-लालचुटुक
अशी कोवळी पालवी अजूनही फुटतेच आहे...
वाट फुटेल तिथे मन मोकाट-सुसाट-सुटलंय,
अन् शरीर अनवाणी-पायांनी सैराट भटकतंय...
तरीही मनाची उभारी अजूनही भक्कम आहे...
चिमूटभर मीठ, चव आणतं सपक-जीवनाला
मनातील समुद्र अति-विशाल पण तो खारटच...
तरी अजूनही, मनामधील गोडवा कायम आहे...
जेव्हा मनामधल्या समुद्राला, येते प्रचंड भरती
तेव्हा जन्म-जन्मांतरीच्या स्मृतींना धुमारे-फुटती...
तरीही अंतरातील चंद्रमा अजूनही हसराच आहे...
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply