कविता – 🌷 ” अंतर्-गाभाऱ्यात “
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – मंगळवार, ७ फेब्रुवारी २०१७
अगणित छोट्या-छोट्या गोष्टी …
अगदी लहान- सहान अतिसूक्ष्म-कृती …
विनासायास, अलगद, आपोआप, सहज …
क्षणार्धात पोहोचतात त्या विधात्यापर्यंत, नक्की …
तो पण देतो त्याची पोच-पावती …
विविध-रूपांनी, भिन्न-भिन्न अलौकिक रीतींनी …
श्वास रोधून, डोळे विस्फारून मंत्रमुग्ध करणा-या सृष्टी-सौंदर्यानी
झाडांच्या हलक्याश्या, सळसळीतून …
पक्षांच्या कर्ण-मधुर जादूई किलबिलीतून …
सूर्याच्या सोनेरी, कोवळ्या-कोवळ्या उन्हातून …
उगीच अंगभर पसरणाऱ्या हलक्याशा-गोड शिरशिरीतून …
मोहक निरागस हास्यातून …
आकाशाच्या गर्द निळाईतून …
झुळकीबरोबर डोलणाऱ्या, वेलींतून …
उमलणाऱ्या फुलांच्या, दरवळणाऱ्या सुगंधातून …
चंद्र-चांदण्यांच्या आकर्षक लुकलुकण्यातून …
बी मधून बाहेर फुटणाऱ्या, अंकूरातून …
सूर्याच्या उगवण्या-मावळण्यातून …
हिमाच्छादित पर्वत-रांगांतून …
डौलात वाहणाऱ्या नद्यांमधून …
धबधब्याच्या कोसळणाऱ्या शुभ्र जलातून …
डोहाच्या सखोल, संथ-संयत अचल स्थिरतेतून …
देहात नखशिखांत झंकारणाऱ्या तरल स्पंदनांमधून …
या आणि अशाप्रकारच्या अनेकानेक,
लक्षावधी रूपांतून तो जणू अलगद पावती देत असतो …
प्रत्येक सूक्ष्मातिसूक्ष्म जीवास एक निस्सीम श्वासाचं,
कवच-कुंडल बहालं करीत असतो …
अनंत रूपे-अगणित हस्ते गुप्त-संदेश देत असतो …
या जगती, कोणी कधीही नाही-एकाकी-एकटा-दुकटा …
बिनधास्त होऊन, बिन-दिक्कत पुढचं पाऊल टाका …
मी सदा आहे स्धित तुमच्या अंतर्-गाभाऱ्यात, कायम साथीला …
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🌅
Leave a Reply