कविता : 🌷’ अंजनेय ‘🌷
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : गुरुवार, ६ एप्रिल २०२३
वेळ : १२ वाजून ३४ मि.
अंजनीपुत्राचा जन्म मंगलदिनी, चैत्र-पौर्णिमेला
जन्मतःच अंगात प्रचंड बळ-साहस व चपलता !
बजरंग-बली आठ चिरंजीवींपैकी एक महावीर
अमरत्व प्राप्त करुनही सदा विनम्र-धीर-गंभीर !
मूलतः तो शिवाचा अकराव्वा महारूद्र-अवतार
म्हणून वज्र-देह असूनही मनी राम-भक्ति अपार !
जन्मजात त्याला कैक विशेष-सिद्धी प्राप्त होत्या,
“प्राप्ति-वशित्वादि-अनिमा-महिमा-गरिमा-लघिमा” !
मत्स्यासम जळी, अखंड विहरी प्राकाम्य-सिद्धीमुळे
आकाशी उंच-उंच उड्डाण,”पवन-पुत्र” असल्यामुळे !
सीतेला त्वरित शोधण्याचं पूर्ण श्रेय जातं ज्यांना,
राम-भक्त-बजरंगबली व सुग्रीव-वानरसेना यांना !
श्रीरामाच्या अंगठीची खूण राम-दूताने दाखविता,
दु:खी-जानकीच्या, पुन: पल्लवित झाल्या आशा !
लढतांना पर्वतकाय अशी शरीर-यष्टी बजरंग-बलीची
संकटात सिद्धी, तत्काळ सूक्ष्मरुप धारण करण्याची !
रावण-महाली कधी लहान तर कधी विराट रुपांनी
हनुमंतानं चपळाईनं पूर्ण लंकापुरी भस्मसात केली !
मुर्छित लक्ष्मणासाठी, द्रोणागिरी उचलून आणला
जडीबूटी-संजीवनीमुळे, जणू पुनर्जीवित तो झाला !
पाहून आवेगानं, रामानं हनुमानाला दिलं प्रेमालिंगन
बंधूभावे हृदय-सिंहासनी, सीतेसह स्थान केलं ग्रहण !
एक-मुखी, पंच-मुखी वा एकादश-मुखी असे हनुमान,
उर्ध्व दिशा अन् चारही दिशा सदा रक्षण करी गतिमान !
सामान्य जनांच्या जीवनी वीर हनुमान अतिमहत्वपूर्ण
वाल्मिकी-लिखित-रामायण, हनुमानावीण आहे अपूर्ण !
सर्वजण म्हणती त्यास अंजनेय-वायुपुत्र-केसरीनंदन
अवघे भक्तजन सदैव करती भक्तिभावे त्रिवार-वंदन !
@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply