कविता – बालगीत 🌷 ‘ मस्त-राम ‘
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
तारिख – शुक्रवार, २९ डिसेंबर २०२३
वेळ – दुपारी २ वाजून २ मि.
ससोबा अहो ससोबा, तुम्ही काय काय करता ?
टुण्-टुण् उड्या मारत, चहूकडे फिरत बसता …
इकडे-तिकडे सदान्-कदा, का हो बावरुन बघता ?
चाहूल लागता कुणाची, घाबरुन पळ का काढता ?
दिसता तुम्ही गोबरे-गोबरे, गोजिरवाणे, सुंदर
स्वभावाने खेळकर-शांत, थोडे चंचल-बिलंदर
तुमचे लांब-लांब कान अन् भन्नाट श्रवणशक्ती
लाल-लाल-चुटुक डोळे अन् कमाल तीक्ष्ण दृष्टी …!
धावताना पाय असे, कमाल कामगिरी करता
पाठीमागे शिकारी लागता, वायु-वेगाने धावता …
नागमोडी वळणे घेत त्यास, पार गोंधळून टाकता
जमिनीत खड्डा खणून त्यात, गुपचुप लपून बसता !
धोका टळताच खड्ड्यातून, सुमडीत बाहेर येता
झाडांची कोवळी-कोवळी, पाने हिरवीगार खाता
ताज्या-ताज्या लाल-लाल, गाजरावर ताव मारता
खूश होऊन उड्या मारीत, सगळी-कडे बागडता …!
ससोबा तुम्ही ना कुणाच्या अध्यात, ना कधी मध्यात
तुम्ही अर्जुन सारखे मस्त-राम, रमता तुम्ही खेळात …
कुरण खाऊन कोवळं, हिरवळीवर लोळत-बसता …
अर्जुन बरोबर खेळताना, मज्जाच मज्जा करता !
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply