कविता : 🌷’ बंधन ‘
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : गुरुवार, १६ मार्च २०२३
वेळ : दुपारी, ०१ वाजून २४ मि.
सुख-दु:खाचं हे विचित्र अन् गुंतागुंतीचं कोडं,
जितकं सोडवू अधिकच गुंतत जाऊ थोडं-थोडं !
मानवी-जीवनात एका क्षणी जे वाटतं हवंहवंसं,
तेच दुसऱ्याच क्षणी वीट येऊन, वाटतं नकोसं !
आयुष्यात ऊन-पावसाचा हा सतत चालतो खेळ
सरळ-धोपटपणे कसा जमवावा सगळ्याचा मेळ ?
दिसतात प्रलोभनं इतकी, माणूस गुरफटतच जातो
त्यानंतर पाठोपाठ, दु:खांच्या फटक्यांनी तो पोळतो !
कधी-काळी होणारा आनंदाचा असा सुखद-वर्षाव,
कधी अचानक उन्मळून टाकतो नियतीचा क्रूर घाव !
नव-बाळाच्या आगमनानं कुटुंबात फुलतं जणू नंदनवन
पण ह्दय-विकाराच्या झटक्यानं होतं आजोबांचं निधन !
एकीकडे कुटुंबात होते एका नव्या व्यक्तीची हर्षदायी भर,
तर दुसरीकडे कुटुंबाच्या आधार-स्तंभाची अंतिम घर-घर
सुखाच्या सुंदर भावनेनं एका डोळ्यात मावत नाही हसू,
तर घायाळ होऊन दुसऱ्या डोळ्यातून पाझरतात आसू !
आनंदी-दु:खीकष्टी होणं, दोन्ही बाजू एकाच नाण्याच्या
त्यांचा उगम सात-कप्प्यांच्या गाभार्यात होतो, मनाच्या !
प्रश्न पडतो ‘नियती-नियती’ म्हणजे नक्की आहे कोण?
हे शोधणं ज्यास जमेल, त्यालाच लाभेल ज्ञानाचा द्रोण !
बहुतांशी जन्म-जन्मांतरीचं पूर्व-संचित म्हणजेच ‘नियती’
त्या पूर्व-संचिताच्या कडू-गोड फल-स्वरुपाची ती प्रचिती !
भगवत् गीतेत म्हणून परोपरीने सांगितलंय, देह आहे नश्वर
निराकार-निर्गुण-आत्म-स्वरुपी तो ईश्वर मात्र आहे अमर !
काम-क्रोधादि षड्रिपुंचे भोग बंधनकारक फक्त जड-देहाला,
पण कोणतंच बंधन नाही अदृष्य-शक्तिमान आत्म-तत्वाला !
सुख-दु:खाच्या पलीकडे जाऊन मन-बुध्दी केली जर तटस्थ,
तर कोणताही कडू-गोड प्रसंग, करु शकणार नाही अस्वस्थ!
कोणताही कडवट प्रसंग कधीच करु शकणार नाही अस्वस्थ!
@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply