कविता : ‘ जगूया ना आनंदानं ‘

कविता : ‘ जगूया ना आनंदानं ! ‘

कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : गुरुवार, ०२ मार्च २०२३
वेळ : ११ वाजून ५४ मि.
कौतुकाच्या नजरेनं वळून-वळून बघायला, कुणी म्हणता कुण्णीच नाही,
पण म्हणून आडवाटेवरच्या एकाकी चाफ्याचं फारसं काही बिघडत नाही 
अखेरीस पानगळ आहे म्हणून दबक्या पावलांनी, पानांनीही साथ सोडली !
एवढं सगळं होऊनही या पट्ठ्यानं जीव ओतून बहरणं काही सोडलं नाही !
होतं असं बर्याचदा, सगळं काही असूनही माणूस पार एकटा पडून जातो,
भला मोठ्ठा गोतावळा गोळा करुनही ऐन वेळी पुरता शुकशुकाट जाणवतो
म्हणून काही हातावर हात ठेवून आढ्याकडे शून्यात बघत बसायला नको,
चार फोन करून, दहा टाळकी जमवून मस्तपैकी मैफील रंगवूच शकतो !
प्रत्येक गोष्टीकडे ज्या दृष्टीकोनातून पाहतो, तशीच ती दिसायला लागते
अर्धी खोली रिकामी असूनही ती अर्ध्याहून अधिक भरलेली भासू लागते !
जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन जर सशक्त तर तेच इंद्रधनुसम झळकते
धडपडत जगण्याची तारेवरची कसरतही काही अंशी गंमतीदार वाटू लागते !
सावत्र आईचा जाच नको म्हणून मुलांना एकहाती वाढवणारे कित्येक महारथी !
पोटच्या गोळ्यासाठी आई व बाप अशी दुहेरी भूमिका निभावणार्या कैक जणी,
झुंझ देण्या रणांगणी जायची गरजच नाही, या सर्वांचं उभं आयुष्य जणू रणभूमी
पण त्यातही आंतरिक समाधान शोधून, कृतार्थ होणार्यांची संख्या नाही कमी !
मनाचा दगड करुन पिल्लांना सोडून अर्थार्जनास जाणारी, आधुनिक हिरकणी
स्वमहत्वाकांक्षेला मुरड घालून भावंडांना इंजिनिअर, डॉक्टर बनवणारा “दादा”
लग्नाचं वय उलटलं तरी संपूर्ण घरा-दाराचा भार हसत-खेळत पेलणारी “ताई “
जशी देवघरं घराघरात, तसेच हे उदार-महान् आई, दादा, ताई आहेत घरोघरी !
घराला घरपण लाभतं ते केवळ अशा असामान्य कर्तृत्ववान व्यक्तींच्या असण्यानं,
एरवी दगड-विटा-सिमेंट-कॉंक्रीटचे बंगले-महालादी उभे फसव्या-खोट्या-दिमाखानं 
सुख-सुख-म्हणत मृगजळाच्या पाठी धावणं, म्हणजे ‘वेळेचा पारा’ बंद मुठीत धरणं !
‘पूर्वी होतं-आज नाही, आत्ता आहे-उद्याची शाश्वती नाही’, म्हणून जगूया ना आनंदानं !
@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!