कविता : ‘ गूढ रम्य प्रवास ‘

कविता : ‘ गूढ, रम्य प्रवास ‘
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : मंगळवार, २८ फेब्रुवारी २०२३
मानवी-जीवन हा एक अत्यंत गूढ, रम्य असा सुखद प्रवास
प्रवास म्हटला की नानाविध यात्रेकरुंचा होणारच सहवास !
प्रत्येकाच्या या प्रवास-मार्गात निरनिराळे ‘विश्राम’ असतात
जन्म घेतल्यापासूनच होते या विशिष्ठशा प्रवासाची सुरुवात 
यात्रेचा पहिलावहिला थांबा, विशिष्ट यात्रेकरूच्या नामकरणाचा
सहयात्री म्हणून सहभाग, जन्मदाते आई-वडील-निकटवर्तीयांचा 
त्या सर्वांबरोबर आनंद-यात्रा जी सुरू होते, ती थेट अनंतापर्यंत
ठळक विश्राम-स्थळं प्रभावी छाप पाडून करतात अनुभव-श्रीमंत 
बाल-मित्र-मैत्रिणींच्या भाबड्या विश्वात उमलती शैशव-पाकळ्या 
सहयात्रींच्या आठवणी चिरकाल टिकतात मनात, होऊन सावल्या 
किशोर-वयातील सह-यात्री म्हणजे जणू प्राजक्ताचा सुगंधी सडा
भरभरुन वाहत्या धबधब्याच्या फेसाळल्या पाण्याच्या रुपेरी कडा
एका-खास-प्रवाश्याचा प्रवेश होतो अन् जीवन-यात्रेचं नंदनवन होतं
अग्नी-देवा-ब्राह्मणांच्या साक्षीने आणाभाका घेऊन, जीवन धन्य होतं
हे सर्वश्रेष्ठ रेल्वे-जंक्शनच पूर्ण प्रवासाला योग्य दिशा व अत्यानंद देतं 
सासर-माहेर दोन्हीकडील सहयात्रींच्या सहवासात मन मंत्रमुग्ध होतं !
नंतर दबक्या पावली हळूच प्रवेश करतात इवले-इवले गोड सहप्रवासी 
त्यांच्या बाळ-लीलांनी अवघी मंतरलेली-यात्रा, जणू रामेश्वर अन् काशी !
हां हां म्हणता प्रवासाला वेग येऊन, वेळोवेळी चांगलीच दमछाक होते,
अधेमधे ठिकठिकाणी थबकत-थांबत-ठेचकाळत यात्रा मात्र चालू राहते 
दरम्यान नवीन सहप्रवासी येऊन आपापल्या थांब्याला पायउतार होतात 
भ्रमरासम क्षण-काळ भेटूनही दीर्घकालीन स्मृती मात्र निर्माण करतात !
अशी ही वेगवान यात्रा मोजून आणलेल्या श्वासांच्या इंधनावर सुरु असते
विविध सहयात्रींच्या बहुमूल्य साथीने ती वेधक, रमणीय अन् खास बनते 
@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!