कविता : ‘ कुणीतरी जवळचं ‘
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
तारिख : सोमवार, २७ फेब्रुवारी २०२३
वेळ : १० वाजून ३० मि.
पूर्वीचं युग नक्कीच होतं सुशांत, सुंदर अन् सुवर्णमयी
आत्ताचं ‘डिजिटल’ युग ही, काही कमी देखणं नाही !
पूर्वी करमणूकीची साधनंच होती अत्यंत मर्यादित,
आज सान-थोर सर्वांना सगळंच मुबलक-अमर्यादित !
उंच-उंच भरारी घेताहेत माणसाच्या नव-कल्पना !
थेट चंद्र-मंगळ ग्रहांवर कूच, नाहीत वृथा-वल्गना !
पूर्वी नभीचा चंद्रमा हाच प्रेमींचा असे एकमेव साक्षीदार
आता चंद्रावर जाऊन-परतणं, हा विज्ञानाचा साक्षात्कार !
पूर्वी काल्पनिक-अद्भुत् गोष्टी, लेखक-कवी रंगवून सांगत,
आता स्वतःच सगळे अनुभवू शकतात ‘आभासी-वास्तव’ !
पूर्वी शब्दकोश वापरुन अडलेल्या शब्दांचा अर्थ समजायचा
आता ‘आंतरजाल’ वापरुन क्षणात सुटतात कठीण समस्या !
पूर्वी पत्ता शोधून वेळेत पोहोचणं ही तारेवरची कसरत होती
आता ‘जीपीएस’मुळे ती कसरत अगदीच इतिहासजमा झाली !
तरी दरेक व्यक्ती आपापल्या कामात, आपापल्या कोशातच दंग
कुणाचं येणं नको-जाणं नको, सारं हसणं वरवरचं उथळ-सवंग !
पूर्वी कोळशावर चालणारी रेल्वे, टांगे, सायकली ही वाहने होती
तरीही लोकं आवर्जून प्रेमाने एकमेकांना भेटण्यास आतूर होती !
आता पेट्रोल-इलेक्ट्रिक-कार्स-रेल्वे-विमाने सर्वच जलद गतींची
पण मायेच्या ओलाव्याअभावी लोकांना भेटायची कमी आसक्ती !
पार्टीज-स्नेहसंमेलनांना औपचारिक भेटी-गाठी झाल्यावरही,
दिखाऊपणाने पूर्वीचा तो नात्यातला सुगंध दरवळतच नाही !
असो पूर्वीचा काळ वा आधुनिक काळ, काळानुरुप हवं वागणं,
आधुनिक तंत्रज्ञान अवगत करुनही माणूसकीनंच वागणं-बोलणं
सगळं असूनही कधीकाळी माणसाला एकटेपण खायला उठतं,
सरतेशेवटी प्रत्येकाला आपलं असं कुणीतरी जवळ हवंच असतं !
सरतेशेवटी प्रत्येकाला आपलं असं कुणीतरी जवळचं हवं असतं !
@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply