तारिख – ३० ऑगस्ट २०१६
कवितेचं नाव – “काळ नावाचं औषध ” 🌷
कवयित्री – तिलोत्तमा विजय लेले
माणूस नावाचा एक अजब प्राणी …
विधात्याला सुद्धा न सुटलेलं कोडं…
मानवी मन म्हणजे उनाड वानर …
चंचल, स्वच्छन्दि, बेछूट, अनावर …
मानवी विचार म्हणजे जणू पाऊस
वेळी अवेळी धो-धो कोसळणारा …
कधी काळी दडी मारून रडवणारा,
तर कधी अतिवृष्टीने सर्वस्व नेणारा !
घटिका, पळे, दिवस पळतच राहतात
जश्या मुंग्यांच्या लांब-लचक रांगा
बघता बघता अवघं आयुष्यही सरतं,
कसं अन् कधी, कळतं का ते सांगा
माणूस अत्यंत बुद्धिमान असतो खरा
पण एका गोष्टीला मात्र घाबरतो जरा
काळाचा त्यावर असतो प्रचंड दरारा !
जसा घोड्याला बसतो चाबकाचा फटका,
तसा माणसाला बसतो काळाचा दणका !
असा हा काळ माणसाला बरंच काही शिकवतो,
आधी त्यावर आंबट-कडू-गोड असे प्रयोग करतो
सरते शेवटी अनुभवांनी शहाणं करुन सोडतो !
काळ आणि वेळ आहेत अगदी भिन्न
काळ येतो चालून अन् करतो छिन्नभिन्न
वेळ आली चालून तर वर्मी घालतेे घाला,
माणूस मनात म्हणतो, वेळ नव्हती आली,
जरी काळ होता आला !
सरते शेवटी काळ औषधही बनतो
विस्मृृतीनेे मनाची जळमटं साफ करतो
दुःखाची झालर पुरती कातरून टाकतो,
वर आनंदाची उबदार शालही पांघरतो !
@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉🌅
Leave a Reply