कविता:🌷”सदा अर्जुन होऊन”


कविता : 🌷 " सदा अर्जुन होऊन "...
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले

आनंदच आनंद, चराचरामध्ये भरलेला…
त्या आनंद-लहरी दश-दिशांनी परतता,

बनूनी अपार-अथांग-अनंत अशा लाटा…
सांगा, तेव्हा स्वानंदाला असेल का तोटा...?

गोष्ट जरी साधीशी, अदृष्य वाटा असती…
मुठींमधून निसटूनी, रेतीलाच मिळते रेती…

दाट धुक्यातून अफाट-अथक प्रयत्नांती…
खडकाळ जमिनीमधून पिकवायचे मोती…

कमलिनीच्या गोड-मिठीत बध्द तो भ्रमर,
हसत-हसतच पचवून टाकी मृत्युचे जहर…

धुंद होऊनी, भान विसरूनी, अवघे प्रहर
काळ मातला, चंद्र हसला, झालाय कहर

क्षण-भंगुर आहे हे तन-मन अन् जीवन…
क्षणिक क्षणभंगुर सुख, देतसे संजीवन…

सत्कृत्यांनी सत्कारणी लागे, परिसासम…
सत्कर्मांनी झळके जणूकाही सुवर्णकण…

जणू हातून झर-झर झरणार्या रेतीसमान,
क्षणन्-क्षण पळून जातात बिजली-समान…

वेळीच जागृत होऊन शोधू जर सत्कारण,
आयुष्य वाया जाणार नाही, विना-कारण…

लक्ष्यावर केंद्रित करून, अचूक नेम धरून…
जीवनाचे-ध्येय साधावे, सदा अर्जुन होऊन…

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!