कविता:🌷”मैत्री-निखळ आनंदाची खात्री”


कविता:🌷"मैत्री-निखळ आनंदाची खात्री"
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

जशी मंत्रांच्या एकमेव स्थानी आहे गायत्री,
तशी सर्व नात्यांमध्ये अनमोल असते मैत्री !
मुखवट्यावीण-आयुष्य-जगण्याची एकसूत्री...

श्रीकृष्ण व सुदामा यांच्यातील अलौकिक मैत्री,
पंच पक्वान्ने झाली फिकी, मूठभर पोह्यापुढती...
अशी दुर्मिळ दोस्ती, की " न भूतो न भविष्यती "

बाल-शिवाजी अन् बाल-सवंगडी-शूरवीर मावळे,
"आधी लगीन कोंढाण्याचे," छाती ठोकून गर्जले...
तळहाती शिर घेऊन प्राण-पणाने मैत्रीला जागले...

अकबर-बिरबल, एक महाराजा दुसरा सल्लागार
पण त्यांच्यातील परम मैत्रीला नव्हताच पारावार
रुसले-हिरमुसले तरी, मित्रा-विना नाही करमणार

कर्ण-व-दुर्योधनाची जगावेगळी पण सच्ची मैत्री,
एकीकडे सूर्य-पुत्र तर दुसरा, प्रत्यक्ष काळ-रात्री...
एक उदार-सज्जन, तर दूजा दुष्ट-कुटील-पातकी... 

क्रूर-निष्ठूर-नियतीने जीवघेणा डाव साधला भारी,
खरोखरचा कुंती-पुत्र-कर्ण, झाला दुष्टांचा कैवारी
मनात ओशाळला समजता कुंती-खरी-जन्मदात्री

धन्य-धन्य तो कर्ण व धन्य त्याची असामान्य मैत्री,
मैत्रीची बूज राखण्यासाठी स्वतःची दिली आहुती...
मैत्रीला जागवून अजरामर झाला कर्ण या जगती...

आजच्या बाजारु, संधीसाधू वृत्तीच्या काळामध्ये,
बेगडी मैत्री कावळ्याच्या छत्री सारखी फोफावते...
तकलादू इतकी, की क्षणार्धात समूळ नष्टही होते...

स्नेह म्हणजे स्निग्धता, स्नेही म्हणजे गाढी मित्रता...
सच्च्या मजबूत दोस्तीसाठी हवी शुद्ध मानसिकता...
तिला वृद्धिंगत होण्यासाठी हवी मनाची परिपक्वता...

या कली-युगात आपण सर्व आहोत बे-घडीचे-यात्री
परंतु जीवन सुसह्य अन् सुख-कारक करणारी मैत्री,
देते, निखळ निरामय आनंदाची, शंभर टक्के खात्री 
देते शुद्ध, निर्भेळ, "निर्मळ" आनंदाची पक्की खात्री

@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉🔆



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!