कविता:🌷”धावून देतो प्रतिसाद”


कविता : 🌷 " धावून देतो प्रतिसाद "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

(🌷"मुक्काम पोस्ट रामेश्वरम्" कवितेचा दुसरा भाग)

तिनं मनोमन साकडं घातलं अन् ...
जणू क्षणार्धात तिच्याच पुढ्यात ...

एक वृद्धसे, सडपातळ सद्गृहस्थ,
बहुधा, तमिळ-ब्राह्मण, असावेत ...
पेहेरावावरुन, तिला तसं वाटलं ...

आले ते थेट तिच्याचकडे व म्हणाले,
"माँजी को साथ लेके रहता हूं आगे"
आप और बच्चे पहोंचना,पीछे-पीछे" ...

तिनं नाही म्हणूनही पूजेची-थाळी,
त्यांनी तिच्या हाता-मधून घेतलेली ...

सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे,
हांहां म्हणता आम्ही पोहोचलो कसे,
ते आजतागायत नाहीच समजलेले ...

मुख्य-पुजारींशी ते त्यांच्या भाषेत बोलले
तिने आणि सासूबाईंनी पद-क्षालन केले...
नंतर वालुका-लिंगाचे, पूजन-अर्चन केले...

जलाभिषेक, पूजा, तांब्यानं पाणी घालणे
त्यांनी सर्वच साग्र-संगीत करवूनही घेतले

रामेश्वरमला वाळूचच स्वयंभू-लिंग पूजतात
स्वतः रामाने स्वहस्ते त्याचे पूजन केलं होतं

लंकेला जाण्या-अगोदर सीतेला शोधण्यास
प्रभूश्रीराम आले रामेश्वरला, शिव-पूजनास

ही आणि अशी अनेक महत्वपूर्ण माहिती,
रस-भरीत वर्णन रंगवून, विविध ठिकाणी
त्यांनी वेळो-वेळी आम्हांस सांगितली होती

मुलांची चुळबुळ पाहून, मुख्य-प्रसादामधले
मूठभर पेढे-बरफी-लाडू दोघांना त्यांनी दिले

तिच्या सासूबाईं, प्रचंड खुश झाल्या होत्या
"गेल्या-जन्मीचं-पुण्य-फळा-आलं, म्हणाल्या"

"म्हणून देवासारखा, हा भला-माणूस आज"
"आपल्या मदतीला धाडला असणार खास"
"एरव्ही निभाव लागणं अशक्यप्रायच होतं"

एवढ्यावर न थांबता, लगेचच ते सदगृहस्थ
त्या सर्वांना गाभाऱ्या-पासून थेट सुखरुप

मुख्य प्रवेश-द्वाराच्या जवळ नेमके जेथे
ते सर्वप्रथम दिसले अन् भेटले-होते तेथे,
अगदी सहज, सुरक्षित-पणे घेऊन आले

त्यांचे अत्यंत मना- पासून आभार मानून,
तिने त्यांना खाली वाकून नमस्कार करून,

प्रसाद-व-दक्षिणा-म्हणून कांही रक्कम दिली
ती दक्षिणा त्यांच्या-कार्याच्या-तोडीची-नव्हती
या सत्याची तिला नक्कीच-पूर्ण-जाणीव-होती

त्या वयस्क सदगृहस्थात,
तिला चक्क रामेश्वराचंच,
सत्य-स्वरूप भासलं होतं ...

वारंवार तिला पुन:पुन: हाच प्रत्यय येतो की,
भक्तांसाठी जगजेठी, येतो विविध-रूपांमधूनी
अन् करतो पूर्ण पूर्ती, त्यांच्या मनो-कामनांची

मनातल्या-मनात मारलेल्या हाकेला सुद्धा
धावून देतो प्रतिसाद, देतो-नवं-नवी-प्रचिती

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!