कविता : 🌷 " ईश्वराधीन-नाती " कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
नात्यांचे बंध म्हणजे जणू समईच्या दिव्य-ज्योती... मंद-शांत, संतत-संयत तेवणाऱ्या स्नेह पूर्ण-वाती... भातुकलीपासून गोळा होती जिवाभावाची-मंडळी... भाग्यवंताना लाभती असे सखे-सोबती-मित्रमंडळी...
काही महत्वपूर्ण अशी नाती, ईश्वराधीन असतात... प्रत्येकाला आई-वडील या तत्वानुसार मिळतात... पूर्व-सुकृतानुरूप जन्मगाठी बांधलेल्या असतात... आयुष्यातील सुख-दु:खाचे हे साथीदार असतात...
अगणित पूर्व जन्मोजन्मीची-पुण्याई फळा येते... तेव्हा मातृ-पितृ-छत्रछाया आयुष्यभराची लाभते... केवळ सद्-भाग्यानंच होतं भावंडाचं-प्रेम लाभणं... अन् एकाच माता-पित्याच्या पोटी जन्माला येणं...
पितृवत् अपार माया करणारे प्रेमळ वडील-बंधू... बाल्यावस्थेत जो आधारस्तंभ, तो होतो केंद्र-बिंदू... आईची उणीव अजिबात भासूही न देणारी बहीण... भगवंताच्या कृपा-प्रसादाविना, मिळणंच कठीण...
Leave a Reply