कविता:🌷”इहलोकी स्वर्ग”


कविता : 🌷 " इहलोकी स्वर्ग "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

असेना का वास्तव्य आपले तुटपुंजे
दीड, पाच, दहा दिवसांचे-वा-तपांचे...
प्रत्त्येक क्षण-न्-क्षण, पर्व आनंदाचे
सुख देणे-सुख घेणे, आहे महत्त्वाचे...

जितका समय आहे लाभला,
ज्याच्या-त्याच्या आयुष्यातला...
रात्रीचा दिवस करूनी आता,
उधाणच येऊ दे कृतज्ञतेला...      

चराचराला चैतन्यमयी करणारा,
अंश-रूपे जीव-जीवात वसणारा...
तो कृपाळू, सर्वांसी तारून नेणारा,
समर्थ आहे काळजी वहावयाला...   

ज्याक्षणी अहम् आणि त्वम् मिसळून
एकरूप, एकसंध, एकजीवच होऊन...
जीव-शिव स्वरूपातील द्वैत ओळखेल,
आप-पर-भाव संपूर्णपणेच विरघळेल...

आपण सारे औट घटकेचे प्रवासी...
हे भान  ठेवूनच, कला जगण्याची...
ज्याला-ज्याला हा मतितार्थ उमगला,
त्यांनी इहलोकीच, स्वर्ग अनुभवला...
त्यांनी इहलोकीच, स्वर्ग अनुभवला... 

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!