कविता : 🌷 " एकमेव-प्रण "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
दस-याच्या दिवशी सुरू विजयश्रीचं नव-पर्व...
नवरात्रोत्सवात शुभ अन् मंगल, सर्वच्या सर्व...
जगी प्राचीन भारतीय संस्कृतिचा सार्थ गौरव
ज्ञान देती वेद, ऋग्वेद-सामवेद-यजुर्वेद-अथर्व
दुर्गेच्या नऊ रूपांमधून, देवींचा असुरांवर जय
दुष्ट प्रवृत्ती-आणि-असत्यावर सत्याचा विजय
मनुष्य-रूपातही रामाचा लंकेशावर दिग्विजय
युध्दात पांडवांनी केला कौरव-सेनेचा पराजय
युगे बदलली, काळ आणि समाजही बदलला
पण सद्-असद्, न्याय-अन्याय-तिढा न संपला
त्यामुळे संघर्ष आणि लढाही चालूच राहिला
सत्कर्माचा कुकर्मावर विजयी ठसा उमटला...
प्रारंभ सरस्वती-पूजनाने, मिळे विद्या, सन्मती
जीवनात सदैव शक्तिपेक्षा महान असते युक्ती...
काळ बदलला तरी स्थिर मूळ विचार-धारणा
कालातीत अशी संपन्न संस्कृती-व-संकल्पना...
वाईट प्रवृत्तींवर मात करणे अनिवार्य, अटळ
काळानुसार सणाच्या स्वरूपातही व्हावे बदल...
करू व्यसन-व-व्याधींचा निप्पात सरळ-सरळ
तेंव्हाच उमलू शकतील, चिखलातूनही कमळ...
बदलले, शत्रू, शस्त्र-अस्त्र, आयुधं आणि खल
पण झाला नाही आसुरी-राक्षसी-वृत्तीत बदल...
जसा रामलीलेत-रावण, मनातही-छुपे-दशानन
अत्यावश्यक आहे करणे, त्यांचे वरचेवर दहन
सत्याचा-जयाचा-यशोन्नतीचा, "दसरा" हा सण
खेचून आणू विजयश्री हा-"एकमेव-आमचा-प्रण"
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply