कविता – बालगीत -🌷” मेजवानी “


कविता - बालगीत -🌷" मेजवानी "
कवयित्री - तिलोत्तमा विजय लेले

झुपकेदार शेपटीवाली एक असे खारूताई
लगबग लगबग करत पळत असते घाईघाई || ध्रु ||

खिडकीसमोर दिसतंय उंच उंच झाड...
माहीत नाही कसं ते झालंय ताडमाड
वसंतात पाने झाली हिरवी-हिरवीगार...
झुळू-झुळू वाहणारा, वारा गारेगार...         || १ ||

काऊ चिऊचा किलबिलाट झाडांवरती
कोकिळेची कुहुकुहू अन् पोपटांची मस्ती...
साळुंकीच्या उड्या अन् कोंबड्यांची कुस्ती
मनी माऊची म्याँव म्याँव, नजर दूधावरती  || २ ||

एकदा एक-मोठी-फांदी खिडकीतून-आली...
खारुताईला आयतीच संधी मिळाली !
रान-मेवा, दाणे, करवंद जांभळी...
ठेंगा दाखवून लगबगीने खाऊ घेऊन गेली  || ३ ||

इकडे-तिकडे भिरभिरताना डोळे लकाकले
आवाजाच्या रोखाने कान टवकारले...
हां हां म्हणता शेपूट घालून सरसर पळाली,
शेंगदाण्यांची मेजवानी पिल्लांना मिळाली...  || ४ ||

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!