कविता : 🌷 " चिरकाल "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले
क्षणभंगुर असते सारे, चिरकाल ते टिकणार नाही
आज असूनही उद्याची मात्र काहीच शाश्वती नाही
शब्द-गीत-काव्य चिरंतन वाहणाऱ्या झ-यासमान
अनंतकाल रिझविती जनास, आहे सत्य सप्रमाण
या जगती शब्दांना लागू नाही कोणतीही परिसीमा
किती तपं, किती युगं सरली तरी त्यांना नाही तमा
सुंदर, सुवासिक फुलं, दोन दिवसात होती निर्माल्य
तरी हस-या कळ्या-फुलांना बोचते कां कसले शल्य ?
अत्तराच्या रूपात दरवळतच राहतो फुलांचा सुगंध
अन् कोमेजून गेलेल्या फुलांना, ठेवतो सदैव जिवंत
कवितेच्या रुपाने शब्दा-शब्दातून डोकावणारी व्यक्ती
अमर नसूनही रसिकांच्या स्मरणात कायम राहील ती...
व्यक्त होण्या, प्राजक्तासम काव्य-पुष्पांचा सडा व्हावा
शब्द-काव्य-जलधारांचा, मन ताजं ठेवण्या शिडकावा
मर्त्य असूनही, काव्य-रूपे चिरकाल जगण्याची खात्री
शब्द-अर्थ-गंधाच्या रुपे, पुन:पुन्हा व्यक्त होते कवयित्री
🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆
Leave a Reply