कविता:🌷” इच्छा-पूर्ती “


कविता : 🌷 " इच्छा-पूर्ती "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

तारकासुरानें तिन्ही लोकी हैदोस घातलेला
ब्रह्मदेवांच्या वरामुळं पुरताच होता मातला…
अत्याचारांनी प्रजा त्राही-त्राही झाली होती
त्या मारण्यास,जन्मला शिवपुत्र-स्कंद अंती…

देव-दानव संग्रामात, स्कंद-बाळच सेनापती
स्कंदमाता-रूपात स्कंदासह दुर्गा सहभागी…
स्कंदबाळ मांडीवर, सिंहावर आरूढ झाली
चार भुजा, त्रिनेत्र-सोन्यापरी तेजस्वी कांती...

दोन-कमल-पुष्पं स्कंदमातेच्या दोन्ही हाती
डावा-वरद-हस्त व स्कंदबाळ-उजव्या-हाती...
पद्मासनात विराजमान म्हणूनी "पद्मासना"
शुभ्र रंग तिज प्रिय-सूर्यापरि दिव्य तेजांगना...

देवी-स्कंदमाता, हिमालयाची-पुत्री ओजस्वी
मातेसह स्कंदबाळ ही रणात लढले सर्वस्वी
देवांचा शूर सेनापती- कार्तिकेय तो मनस्वी…
दिव्य-शौर्य पाहून स्तंभित झाले सर्व तपस्वी...

मुरुगन-स्कंदाने लीलया वध केला तारकाचा...
स्कंद-मातेने आणि षणमुखाने, दानव-सेनेचा
नाश केला, अन्यायाचा, दुष्ट-पापी-दानवांचा...
सर्व देवतांनी जयकार केला विजयी स्कंदाचा

देवीच्या उपासनेमुळे दिव्य आभा झळाळते
भक्तांचे, असामान्य व्यक्तीमत्व बनत जाते...
कर्तृत्व, धडाडी, ओजस, यशश्री प्राप्त होते
उपसकांच्या सर्वच इच्छांची, पूर्ण-पूर्ती होते...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!