कविता:🌷”मुक्काम पोस्ट रामेश्वरम्”


कविता : 🌷 " मुक्काम पोस्ट रामेश्वरम् "
कवयित्री : तिलोत्तमा विजय लेले

खूपच जुनी गोष्ट आहे आजची ...
रामेश्वरमला गेलो होतो तेंव्हाची ...

एका वर्षी " अहो आईना " घेऊन,
त्यांच्या इच्छेनुसार रामेश्वरम् केलं ...

मुंबईहून विमानाने गेलो, कोयम्बतूरला ...
मग कार हायर करून गेलो रामेश्वरमला ...

खूप सुंदरसं ठिकाण, मंदिराच्या जवळचं,
एक छानसं हॉटेल सर्वांत जास्त आवंडलं

रम्य समुद्र-किनारा, स्वच्छ मऊ रेती ...
मस्त निसर्ग, झाडं नारळी-पोफळीची ...

चविष्ट साऊथ-इंडियन पदार्थ खायला
आल्हाद-दायक हवा, बागा फिरायला

फुलांनी डवरलेली भरगच्च झाडं-झुडूपं ...
एकूणच निसर्ग-सौंदर्य फार उत्कृष्ट होतं ...

बाहेरच्या बाजूलाच, झुलायला हॅमॉक्स ...
मोठा स्विमिंग पूल, छान-गार्डन-चेअर्स ...

साईड-टेबलवरून खाता-पीता, वाचन ...
मस्त तब्बेतीनं, प्रत्येक क्षण आनंदानं ...

सर्वप्रथम स्नान केल्यावर तन व मन ...
झालं होतं एकदम मस्त, ताज-तवांनं ...
नंतर समुद्रतटावर मारली एक चक्कर ...

नवरोजी हॉटेलवर आराम करणार ...
मग मी, सासूबाई, दोन लहान मुलं ...
अन् हे मोठं-थोरलं, पूजेचं-साहित्य ...

अशी वरात हलत-डुलतच आली ...
शिवमंदिराच्या मुख्य-प्रवेश-द्वारी ...
येथवर ठीकच होतं, सगळं काही ...

दगडी, भक्कम, अति-भव्य प्राचीन मंदिर
दगडीच जाड-जूड खांब, भिंती व जमीन

तिने सासूबाईंना दिला होता एक हात ...
त्यांना डायबेटिसमुळं कमी दिसायचं ...
दुसऱ्या हातात, पूजेचं-साहित्य तोललेलं ...

दोन्ही मुलं, तेव्हा लहान असल्यामुळं
चालत होती, तिला चिकटून-चिकटून ...

मुख्य-प्रवेश-द्वारी व मंदिराच्या आवारात,
प्रचंडं चिखल व ओलसर निसरडी जमीन

बहुतांश लोक साऊथची भक्त- मंडळी,
संपूर्ण ओली, समुद्रात मारुन बुचकळी,
मग ओलेत्यानं महादेव-दर्शनास,आलेली

त्यांच्या डोक्यावर, अंगावर किलो-भर तेल
त्यांच्या अंगावरून निथळणाऱ्या पाण्यातून

निसरड्या दगडी फ्लोअरवर तेलाच्या तवंगामुळं
तेल मिश्रित पाणी खाली पडून झालेलं थारोळं

मुख्य-प्रवेश-द्वारा-पासून देवाचा-गाभारा होता,
लांबच-लांब प्रचंड प्रशस्तशा-मंदिराला साजेसा
ते पाहून तिच्या पोटात भीतीनं गोळा आलेला

प्रत्यक्ष स्वतःला व वयस्क-सासूबाईंना,
अजाणत्या कोवळ्या वयाच्या मुलांना,
आणि साग्र-संगीत पूजा- साहित्याला ...

या निसरड्यातून इतकं प्रचंड अंतर कापून,
देव-दर्शनाला सुरक्षितपणे कसं बरं न्यायचं

मनातल्या-मनातच तिनं त्या,
रामेश्वरालाच साकडं घातलं ...

" बाबारे, या गतीनं आम्ही,"
"पडलो-बिडलो नाही जरी,"

"चार-पाच तासांनी पोहोचू "...
"तूच, आता कर काही जादू "...

जादूची कमाल-धमाल यानंतरची ...
ती बनेल आपली कविता उद्याची ...

🌷@तिलोत्तमा विजय लेले
🙏🕉️🔆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


error: Content is protected !!